पवना नदीत धरणातून पुन्हा विसर्ग

धरणात 94.44 टक्के पाणीसाठा

पिंपरी  – पवना धरणक्षेत्रात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत दहा हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग कमी करण्यात आला. नदीमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दुपारनंतर पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सुटकेचा श्‍वास घेतला.

पवना धरणक्षेत्रात आजपर्यंत एकूण 2849 मिमी पाऊस पडला असून गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत 2236 मिमी एवढी नोंद झाली होती. काल दिवसभरांत पवना धरणक्षेत्रात 101 मि.मी. पावसाची नोंद झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली होती. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे गुरुवारी सकाळी पवना धरणातून 10 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली. दुपारपर्यंत हा विसर्ग कायम होता. मात्र गुरुवारी दिवसभरात धरणक्षेत्रात केवळ 21 मिमी पाऊस पडल्याने पाचच्या सुमारास हा विसर्ग कमी करून तो 7030 क्‍यूसेक करण्यात आला.

पवनेतील विसर्ग वाढल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील नदीकाठच्या काही झोपड्यांना त्याचा फटका बसला. मात्र काही तासांतच पाणी कमी झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सुटकेचा श्‍वास घेतला. सध्या पवना धरणात सध्या 94.44 इतका पाणीसाठा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.