शिवसेनेकडून पवार यांचा खंदा मार्गदर्शक म्हणून उल्लेख

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि नंतर नव्या सरकारच्या स्थापना प्रक्रियेत केंद्रस्थानी राहिलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी शिवसेनेला वाटणारा आदर पुन्हा सूचित झाला आहे. शपथविधी सोहळ्याच्या दिवशीच शिवसेनेकडून पवार यांचा खंदा मार्गदर्शक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे तीन पायांचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी खिल्ली भाजपकडून उडवण्यात आली. त्याचा समाचार गुरूवारी प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून घेण्यात आला आहे. नवे सरकार राष्ट्रीय प्रश्‍नांवर नव्हे; तर महाराष्ट्राच्या प्रश्‍नांवर आणि विकासाच्या मुद्‌द्‌यांवर स्थापन झाले आहे. राज्याचा विकास करण्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत.

मुख्य म्हणजे, सरकारी बंगले, सरकारी कार्यालये आणि तपास यंत्रणांचा वापर कपट-कारस्थानांसाठी होणार नाही हे निश्‍चित. त्यामुळे स्वच्छ, निर्मळ मनाने कारभार चालेल. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी आणि खंदा मार्गदर्शक पाठिशी आहे. तिन्ही बाजूंना प्रशासनाची चांगली जाण असणाऱ्या माणसांची फौज आहे, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. सरकार अल्पजीवी ठरेल असे वाटणाऱ्यांचा तो भ्रम आहे, असा शाब्दिक टोलाही त्यातून लगावण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.