मालदीवचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांना 5 वर्षांची शिक्षा

माले : मालदीवचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांना आज मनी लॉन्डरिंग प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. एका आलिशान लक्‍झरी टुरिस्ट ठिकाणातील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणाच्या तपासादरम्यान यमीन “मनी लॉन्डरिंग’ प्रकरणात सहभागी असल्याचे आढळले होते.

अब्दुल्ला यमीन यांनी मालदीववर आपली एकाधिकारशाही गाजवली होती. 2018 मधील निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास सुरू असतानाच त्यांच्यावर दहा लाख डॉलर आपल्या बॅंक खात्यातून बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्याचा आरोप झाला होता.

या पैशाच्या अफरातफरीच्या खटल्यात साक्षीदारांना लाच देण्याच्या आरोपाखाली त्यांना फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. यमीन यांच्या मालकीच्या बॅंक खात्यांवर गेल्या वर्षीच्या शेवटी अवैध मार्गाने मिळवलेले सुमारे 6.5 दशलक्ष डॉलर जमा झाले होते. यामीन यांनी परदेशात आणखी कोट्यावधी डॉलर लपवले असू शकतात आणि ते परत मिळवण्याचे काम सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

यमीन यांच्या सरकारने पाच वर्षांच्या सत्तेत असताना विरोधकांना नियमितपणे तुरूंगात डांबले किंवा त्यांना हद्दपार केले. मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत त्यांच्यावर नेहमीच टीका झाली. राजकीय आणि आर्थिक पाठबळासाठी यमीन चीनवर अवलंबून रहात असत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.