मुंबई – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्यामुळे अजित पवार यांच्या गळ्यात विरोधीपक्ष नेते पदाची माळ पडली. मात्र विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता कोण असणार याचा सस्पेन्स कायम असताना शिवसेनेच्यावतीने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानपरिषदेत राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेचा विरोधीपक्ष नेता शिवसेनेचा नेमण्यात यावा असा ठराव विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे आमदारांनी दिला आहे. असे झाल्यास ठाकरे सेना विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष विधानपरिषदेत पाहायला मिळणार आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल.
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्यासाठी राष्ट्रवादीला संधी मिळाली तर नुकतेच आमदार झालेल्या एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. तत्पूर्वी शिवसेनेनकडून दावा सांगितल्यामुळे आता विधानपरिषदेत सेना विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढाई पाहायला मिळणार आहे. शिवसेना विरोधी पक्ष नेते पदासाठी कोणत्या नेत्याची निवड करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.