यवत – दौंड तालुक्यातील महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत असणारा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा सोपवून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. दौंड बाजार समितीत शिवसेनेला जागा वाटपात डावलल्याने हा राजीनामा नाट्याचा ट्रेलर समोर आला आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांची सभा होण्यापूर्वी ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.
दौंड बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीकडून शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याने आणि महाविकास आघाडीमध्ये बाकी मित्र पक्षाला विचारात न घेता राष्ट्रवादी स्वतः निर्णय घेत असल्याने नाराज असलेल्या पासलकर यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा शिवसेनेच्या ठाकरे गटात आहे.
राष्ट्रवादीने दौंड तालुक्यात महाविकास आघाडीचा नियम न पाळता शिवसेनेला एकही जागा दिली नसल्याने उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. त्याच नाराजीमधून काही दिवसापूर्वी खासदार संजय राऊत यांची भीमा पाटस कारखान्याच्या 500 कोटी घोटाळ्याची सभा ही रद्द झाली असल्याची माहिती महेश पासलकर यांनी सोशल मीडियावरून प्रसारित केली होती.
खासदार राऊत यांनी सभा रद्द केली असल्याची माहिती माझ्याजवळ दिली असून असा निरोप माजी आमदार रमेश थोरात यांना देण्यास सांगितले असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रमवस्था होती. यामुळे भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या घोटाळ्याच्या आरोपाची संजय राऊत यांची सभा दौंड तालुक्यात होणार की नाही, अशी उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद हा आता चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा तालुकाभर होत आहे.
वरवंडची सभा होणार- थोरात
खासदार संजय राऊत यांच्या सभेबाबत दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठरलेल्या बुधवार (दि.26) या दिवशीच वरवंड येथे खासदार संजय राऊत यांची भीमा पाटस कारखान्याच्या 500 कोटीच्या घोटाळ्याबाबत सभा होणार आहे. त्या सभेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे.