Rae Bareli Constituency – काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. राहुल गांधी त्यांच्या आई सोनिया गांधी, बहीण प्रियंका गांधी आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह रायबरेली निवडणूक कार्यालयात पोहोचले आणि उमेदवारी दाखल केली. राहुल गांधी आता त्यांची आई सोनिया गांधी यांचा वारसा पुढे नेणार आहेत.
वास्तविक, राबरेलीत फिरोज गांधी यांनी 1952 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. 1958 मध्येही ते विजयी झाले. यानंतर इंदिरा गांधींचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांच्यानंतर सोनिया गांधी पाच वेळा येथून खासदार झाल्या आहेत. आता राहुल गांधी गांधी घराण्याचा वारसा येथून सांभाळणार आहेत. तर गांधी घराण्याचे जवळचे सहकारी किशोरीलाल शर्मा यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणाऱ्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. रायबरेली आणि अमेठीच्या जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
काँग्रेसने 16 वेळा मिळवला विजय –
काँग्रेस पक्षाने रायबरेली जिल्ह्यातील लोकसभेची जागा 16 वेळा जिंकली आहे. भारतीय जनता पक्षाचे अशोक सिंह हे दोनदा विजयी झाले आहेत. जनता पक्षाचे राजनारायण एकदा विजयी झाले आहेत. बसपा आणि सपाला अद्याप येथे खातेही उघडता आलेले नाही. 2019 मध्ये सोनिया गांधी यांनी निवडणुक जिंकली होती.