मुंबई – पुण्यात झालेल्या एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवारांनी “मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल…’, असे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरतील का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहे.
शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर शरद पवार आणि अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर देखील सतत या विषयी चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा स्वतः अजित पवार यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “1967 पासून शरद पवार साहेबांवर बारामतीने विश्वास ठेवला आहे. शरद पवार साहेबांनी माझ्यावर 1990 पासून माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला मी तडे जाऊ देणार नाही. कोणी काय डोक्यात वेगळा घालायचं प्रयत्न केला तर डोक्यात घेऊ नका’. असं स्पष्ट वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं.