मुंबई – सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीपर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील आठवड्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आपला निर्णय देतील असा अंदाज आहे.
दुसरीकडे, नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईचे वेळापत्रकही लवकरच ठरवण्याची शक्यता आहे. यामुळे यासंबंधीची सुनावणीही पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बंडखोरीत शिवसेनेचे जवळपास ४० आमदार फुटले होते. त्यानंतर शिंदेंनी शिवसेनेवर दावा सांगत संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेतला होता.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने हा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला होता. तसेच त्यांना या प्रकरणाचा निकाल १० जानेवारीच्या आत देण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यानंतर नार्वेकरांनी सुनावणी पूर्ण करून आपला निर्णय राखून ठेवला.
आता हा निकाल पुढील आठवड्याच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर सध्या या प्रकरणाचा निकाल लिहिण्यात व्यस्त आहेत. त्यांचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. हे काम संपताच ते वेळ न दवडता हे प्रकरण हातावेगळे करतील.