प्रत्येक दाखल्याची करावी लागतेय दुरुस्ती

पुणे – जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदीसाठी नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस)चा वापर महापालिकेने सुरू केला असला, तरी या नोंदणी प्रणालीत जन्म-मृत्यूची नोंद करताना प्रादेशिक भाषांचा समावेश नसल्याने जवळपास प्रत्येक दाखल्यातील नावामध्ये चूक होत आहे. त्यामुळे नागरिकांना आधी दाखला मिळवताना दोन-दोन महिन्यांचा कालावधी जात असतानाच; दाखला मिळाल्यानंतरही पुन्हा दुरुस्तीसाठी महापालिकेचे उंबरे झिजवावे लागत आहेत. तर, या दुरुस्तीसाठी आवश्‍यक मनुष्यबळही पालिकेकडे नसल्याने या अडचणीत भर पडत आहे.

महापालिकेकडून “सीआरएस’अंतर्गत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे या दाखल्यांची नोंद घेण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी फक्‍त 5 उप निबंधक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही कामाचा व्याप असल्याचे सांगत या नोंदीकडे दुर्लक्ष केले जाते. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या हॉस्पिटलकडून जन्म झालेल्या मुलांची माहिती या कार्यालयास कळविली जाते. तसेच स्मशानभूमीकडून मृत्यू पासेसची माहिती त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयास दिली जाते. त्यानुसार बाळाचे नाव, माता-पित्याचे नाव, आडनाव ही माहिती क्षेत्रीय कार्यालयातील ऑपरेटर ऑनलाइन यंत्रणेत भरतात. ती भरताना इंग्रजीत भरली जाते. नंतर ती मराठीतही भाषांतरित होते.

मात्र, हे भाषांतर होताना अनेकांचे आडनाव, नाव, माता-पित्याचे नाव हमखास चुकते. ही माहिती भरताना पालक अथवा नातेवाईक नसतात. अर्ज भरताना ते नाव मराठी अथवा इंग्रजीत देतात. ही भाषेची समस्या असल्याने अनेकांच्या नावाला अनेकदा काना, मात्रा, मराठीत असलेल्या दाखल्यात येतो. त्यामुळे नातेवाईकांना दाखला मिळल्यानंतर पुन्हा क्षेत्रीय कार्यालयांकडे नाव बदलण्यासाठी जावे लागते. हे नाव बदलण्याचे अधिकार उपनिबंधकांना असले तरी तीन क्षेत्रीय कार्यालयांची जबबदारी असल्याचे सांगत हे अधिकारी कार्यालयातून बेपत्ता असतात.

अशा झाल्या आहेत चुका
“हेमंती’ऐवजी इंग्रजीमधील अक्षरांमुळे “हेमांती’, “कानडे’ आडनाव असताना “कानाडे’ , “गायकवाड’ असताना “गायाकवाडा’ अशा शेकडो चुका जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांमध्ये होत आहेत. या चुका भाषांतरावेळी संगणक यंत्रणेमुळे होत असल्या, तरी महापालिकेकडून मात्र नागरिकांवरच खापर फोडले जाते. पूर्वीच्या यंत्रणेत दाखल्याची माहिती भरताना इंग्रजी आणि मराठीत दोन्ही भाषांमध्ये दाखले भरता येत होते. त्यातच, आता ही यंत्रणा ऑनलाइन असल्याने ही सुविधाच नसल्याने यंत्रणेच्या चुकीचा फटका पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.