पुणे – उद्या ( ९ डिसेंबर ) पुण्यात शिवसेनाचा ( ठाकरे गट ) पुण्यात जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्याला खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे मार्गदर्शन करणार आहे. यासाठी पुण्यात ठिकठिकाणी फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. पुण्यातील शिवसेनेचे हे फ्लेक्स सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.या फ्लेक्सवर राऊत यांचा उल्लेख थेट ‘वाघेश्वर बाबा’ असा करण्यात आला आहे. ( Shivsena pune flex )
शिवसेनेमध्ये उभी फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर फक्त टीकाच नाही तर संपूर्ण शिंदे गटाला थेट अंगावर घेत खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने जोरदार हल्लाबोल केला. राऊत हे आपल्या आक्रमक बाण्यासाठी आणि खास शैलीसाठी ओळखले जातात. म्हणूनच पक्षासाठी आजही ते मोठ्या मोठया सभा घेताना दिसतात.अशात राऊतांच्या मिळाव्यासाठी पुण्यात लागलेले बॅनर्स चांगलेच चर्चेत आले आहेत. ( Sanjay raut wagheshwar baba )
“शिवसेनेचा जाहीर मेळावा.. मातिश्रीचा निष्ठावंत, निष्ठावंतांचा वाघेश्वर बाबा, शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ” असा आशय असलेले फ्लेक्स सध्या पुण्यात शिवसैनिकांकडून लावण्यात आले आहेत. यावर संजय राऊत यांचा केलेला ‘वाघेश्वर बाबा’ असा उल्लेख सगळ्यांचाच लक्ष वेधून घेतोय. ( Shivsainik )
नुकतंच काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये ‘बागेश्वर बाबा’ अर्थात धीरेंद्र शास्त्री येऊन गेले. ज्यांच्या कार्यक्रमाला संपूर्ण पुण्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर आता शिवसैनिकांनी राऊत यांचा उल्लेख ‘वाघेश्वर बाबा’ करून जणू त्यांना नवं बिरुदच बहाल केलं आहे कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे. सध्या राज्यात सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन आणि राजकीय वातावरण पाहता संजय राऊत कार्यकर्त्यांना या मेळाव्यातून काय आदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.