“वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद; “इम्पॅक्ट ऍप’च्या सहकार्याने गरजूंना 21 लाखांची मदत
सातारा – भगव्या पताका, शिंग, तुताऱ्या, ढोल, लेझीमचा नाद आणि “जय भवानी जय शिवाजी’चा गजर अशा भारावलेल्या वातावरणात सातारा शहरातल्या पाचशेहून अधिक हिरकणींनी नऊवारी साड्यांच्या पारंपरिक वेषात राजवाडा ते पोवई नाका, अशी वॉकेथॉन काढली. हिरकणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित वॉकेथॉनची नोंद लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.
शिवजयंतीनिमित्त हिरकणीच्या फाउंडेशनच्या पारंपरिक वेषातील वॉकेथॉनच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नऊवारी साड्या नेसलेल्या हिरकणींनी गांधी मैदान सकाळी साडेसात वाजता फुलून गेले होते. ढोल, लेझीमपथक, भगवे झेंडे आणि घोड्यावर आरूढ झालेल्या हिरकणींनी वातावरणात शिवमय केले. त्या आधी किल्ले अजिंक्यताऱ्यावरून आलेल्या शिवज्योतीचे लेझीमच्या लयीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर हिरकणी फाउंडेशनच्या धनश्री शेलार व महिलांनी “जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत वॉकेथॉनला प्रारंभ केली.
या वॉकेथॉनमध्ये साताऱ्यातील पाचशेहून अधिक महिलांनी भाग घेतला. डोक्यावर फेटा बांधलेल्या, नाकात नथी, पारंपरिक दागिने घातलेल्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या नऊवारी साड्या परिधान केलेल्या हिरकणींनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. वॉकेथॉन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. राजवाडा, मोती चौक, कमानी हौद, शेटे चौक, पोलीस मुख्यालयमार्गे वॉकेथॉन पोवई नाका येथील शिवतीर्थावर पाहोचली. तेथे हिरकणींचे ढोल, लेझीमच्या निनादात भव्य स्वागत करण्यात आले.
हिरकणी फाउंडेशनच्या सदस्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवतीर्थाला प्रदक्षिणा घालत शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या वॉकेथॉनची दखल लंडन येथील “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये घेण्यात आली आहे.
या विक्रमाची नोंद करण्यासाठी “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्’च्यावतीने साताऱ्यात आलेल्या संजय पंजवानी यांनी ही माहिती दिली. या वॉकेथॉनचा वेगळेपणा, महिलांचा प्रचंड सहभाग यामुळे विक्रमाची नोंद झाली. सहभागी महिलांना या विक्रमाबाबत तात्पुरती प्रमाणपत्रे देण्यात आली. अहवाल सादरीकरण व प्रत्यक्ष विक्रमाची नोंद, या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे पंजवानी यांनी सांगितले. दरम्यान, इम्पॅक्ट फिटनेस ऍप व हिरकणी फाउंडेशनच्यावतीने गरजूंसाठी 21 लाख रुपयांचा मदत निधी उभारण्यात आल्याचे धनश्री शेलार यांनी सांगितले.