शिरूर -शिरूर शहर व पंचक्रोशीत काही भागात बुधवार (दि. 13) रात्री आठच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे व फांद्या तर काही ठिकाणी फ्लेक्सचे बोर्डही पडले आहेत. अनेक गावांत शेतीमालाचे नुकसान झाले आहे. शिरूरजवळील रावसाहेब गायकवाड यांच्या घरासमोर मोठे झाड उन्मळून पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. यात जीवितहानी झाली नाही.
रात्री आठच्यादरम्यान जोरदार सुसाट वारा सुटला होता. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने शिरूर परिसरातील नागरिकही भयभीत झाले होते. या भागात चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कर्डीलवाडी, करडे, तर्डोबावाडी, सरदवाडी, अण्णापूर, रामलिंग, टाकळीहाजी, गोलेगाव, निमोणे भागातही पावसाने हजेरी लावली होती. टाकळी हाजी भागातील डाळिंब पिकाला थोडाफार फटका बसला आहे. मका पीक जमीनदोस्त
झाले आहे.
शिरूर पंचक्रोशीतील तरकारी, कांद्याचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये झाडांच्या फांद्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती, पाबळ फाट्यावरील लोखंडी फ्लेक्स बोर्ड तुटून पडले आहेत. शिरूर पोलीस स्टेशन रस्त्यावरील शासकीय वसाहती नाका नंबर एकजवळील रावसाहेब गायकवाड यांच्या घरावर मोठे झाड तुटून पडले आहे. वादळी पाऊस वाढल्याने हे कुटुंब घरातच बसले होते. मात्र, हे झाड घरासमोर पडल्याने जीवितहानी टळली. घराच्या अर्धाफुट आत झाड पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती, असे नागरिकांनी सांगितले.