निमोणे – शिरुर तालुक्यात (जि. पुणे) जुन्या वादातून दोन जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी अवस्थेत आधी शिरुर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा (दि 14) रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संतोष रंभाजी मोहीते आणि राहुल रंभाजी मोहीते (दोघे रा. चव्हाणवाडी, ता. शिरुर, जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार 12 जानेवारी रोजी 6:30 वाजण्याच्या सुमारास चव्हाणवाडी येथील संतोष रंभाजी मोहीते यांच्या घरासमोर संतोष रंभाजी मोहीते आणि राहुल रंभाजी मोहीते यांनी जुन्या भांडनाचा राग मनात धरुन बाळासाहेब माणिकराव गरुड (वय 53) यांना शिवीगाळ व दमदाटी केली आणि लोखंडी खोऱ्याने तसेच दगडाने डोक्यात व पायावर मारहान करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शिरुर तसेच अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
परंतु उपचारासादरम्यान बाळासाहेब माणिकराव गरुड यांचा रविवारी (दि 14) मृत्यू झाला. याबाबत सचिन बाळु गरुड (वय 25, रा. चव्हाणवाडी ता. शिरुर जि.पुणे) यांनी फिर्याद दाखल केली असून त्यानुसार संतोष रंभाजी मोहीते आणि राहुल रंभाजी मोहीते या दोघांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.