शिरुर (प्रतिनिधी) : शिरूर शहरासह तालुक्यातील विविध सहा गावांमध्ये 17 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून तालुक्यात दोन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यातून आज 54 जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने पाठवण्यात आले आहे. यावरूनच शिरूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरूच आहे हे स्पष्ट होते. आता मात्र आरोग्य, महसूल, पंचायत समिती, नगर परिषद व इतर खात्याने आता तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियोजनच करायला हवे आहे.
शहरात शिरूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले, नातेवाईक, नागरिक अनेक जण होम क्वारंटाईन असून सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. त्यांना याबाबत कुठलीही गंभीरता नाही. तर प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची कमी आता जाणवू लागली आहे. यासाठी प्रतिबंध क्षेत्रात स्वतंत्र स्वयंसेवकांची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने मोठी पावले उचलणे आता गरजेचे आहे.
शिरूर शहरात 7, रांजणगाव गणपती 2, सणसवाडी 2, कोरेगाव भीमा 3, शिक्रापूर 2, सोनेसांगवी 1 असे सहा गावात सतरा कोरोना बाधित रुग्ण आढळले असून मांडवगण फराटा व शिक्रापूर येथे दोन वृद्धांचा कोरोना संसर्गामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.