सातारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार साताऱ्यातील शिंदे गट ऍक्टिव्ह झाला असून जिल्हा शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्याचे शिंदे गटाचे कट्टर समर्थक शरद कणसे यांनी साताऱ्यात तीन दिवस तळ ठोकून जिल्हा दौरा केल्याने शिंदे गट ऍक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक अद्यापही संभ्रमावस्थेत असून जिल्ह्यातील मी मी म्हणणारी उद्धवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. खंडाळा, कोरेगाव, वाई तसेच सातारा या चार तालुक्यांमध्ये शिंदे गटाचा राजकीय दौरा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व ठाणे महापालिकेचे वागळे इस्टेट प्रभागाचे नगरसेवक शरद कणसे हे तीन दिवस सातारा विश्रामगृहात तळ ठोकून होते.
त्यांनी सातारा, पाटण, कराड, वाई असा चार तालुक्यांचा स्वतंत्र दौरा करून बऱ्याच शिवसैनिकांना भावनिक साद घातल्याने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची पुरती चलबिचल झाली आहे. शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये शिंदे संपर्कातील शिवसैनिकांना बाहेरचा रस्ता दाखवत बरेचसे नवे चेहरे जिल्हा कार्यकारिणीला दिले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते नितीन बानगुडे पाटील व शेखर गोरे यांच्यावर शिवसेनेची कमान सांभाळण्याची आता जबाबदारी येऊन पडली आहे. यातून पुरूषोत्तम जाधव व साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते असा मोठा गट शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाने प्रमुख शाखाप्रमुख तसेच शिवसेनेच्या हिंदुत्व मुद्द्यांवर काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे.