पिंपरी, (प्रतिनिधी) – या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार पालक नव्याने अर्ज सादर करत आहेत. मात्र, ऑनलाइन तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेळेत नवीन अर्ज क्रमांकाचा मोबा`ईलवर पासवर्ड येत नसल्याने अर्जाची पुढील प्रक्रियाच होत नाही. त्यामुळे पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३१ मे २०२४ पर्यंत असल्याने पालकांची लगबग सुरु आहे.
पूर्वी सन २०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आलेली आहे. त्यानुसार नव्याने अर्ज प्रक्रिया सुरु आहे. यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या या वर्षाच्या आरटीई प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही. असे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने स्पष्ट केले आहे.
पालकांसाठी सुचना
– अर्ज भरताना पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये.
– जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावी.
– १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.
– आवश्यक कागदपत्र तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो.
– अर्ज भरल्यानंतर जर तो चुकला तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
– डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
– अर्ज क्रमांक, अर्जाची प्रत लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
– अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास प्रवेश रद्द होईल.
– ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३१ मे २०२४ पर्यंत राहील.
– दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र ४० टक्के आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
– निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे.
– निवासी पुरावा म्हणून फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
– लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून त्यानुसार अक्षवृत्त व रेखावृत्त प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही.
दिव्यांग बालकांसाठी सुचना
दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com किंवा educom-mah@mah.gov.in वर इमेल पाठवावा.