Pune Porsche accident । Ajit Pawar : पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सर्व स्तरातून उमटले आहेत.
मात्र, जनतेने आवाज उठवल्यामुळे जामीनावर सोडलेल्या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील, कोझी व ब्लॅक पबचे मालक आणि कर्मचारी यांची शुक्रवारी (ता.२४) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, हिट अँड रन प्रकरणावर अखेर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेनंतर अजित पवार माध्यमांसमोर आले नव्हते. आज अजित पवारांनी पुण्यात एका शोरुमच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली असून, यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी रितसर जी काही कारवाई होणार’ असं अजित पवार म्हणाले.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “कुणावरही आकस बुद्धीने काही कारवाई होणार नाही. पण जे कुणी दोषी असतील ते किती मोठे असले, कितीही श्रीमंत असले, कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी रितसर जी काही कारवाई असेल ती केली जाईल.
कायदा हा श्रीमंताला, गरिबाला आणि मध्यमवर्गीयालादेखील सारखा आहे. नियम सगळ्यांना सारखे आहेत. त्याचप्रमाणे कारवाई चाललेली आहे.’ अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली.
‘या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याबद्दल मला वेळोवेळी पोलीस आयुक्तांनी जी माहिती द्यायची होती ती देत होते. पोलीस आयुक्तांनी स्वत: तुमच्यासमोर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. मी आजही पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यांनी प्रत्येक मिनिटोमिनट काय-काय घडलं याविषयी सांगितलं.
अल्पवयीन आरोपीला बेल कशी मिळाली? हे देखील तुम्हाला समजलं आहे. त्याबाबत वेगवेगळ्या बातम्या आल्या. न्यायालयाने बेल का द्यावी हा न्यायालयाचा प्रश्न आहे. या प्रकरणी ज्या गोष्टी कडक घेतल्या जायला हव्यात तशा कडक घेतल्या गेल्या आहेत”, असं अजित पवारांनी सांहितलं.
अजित पवार पुढे म्हणाले, ‘या प्रकरणात कोणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वत: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पालकमंत्री म्हणून लक्ष घातलं आहे.
मी पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून लक्ष देवून आहे. माझं बारकाईने लक्ष आहे. त्याची तीव्रता कमी झाल्यावर मग फाटे फुटतात. पब संस्कृती वाढली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु झाली आहे’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.