शिमला – ख्रिसमसनंतर आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिमलासह मनाली सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे यंदा वर्षाअखेर मोठा वीकेंड आहे. त्यामुळेच शिमला ते मनालीपर्यंत पर्यटकांची संख्या यंदा तुलनेने जास्त आहे.
नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे या भागात वाहनांची वर्दळ वाढली आहेत. अशातच इंधनाच्या विक्रीतही कमालीची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिसमस वीकेंडमध्ये रविवारी 28,210 हून अधिक वाहनांनी अटल बोगदा पार केला. तर शिमला आणि मनालीमधील 90 टक्के हॉटेल बुक झाली आहेत.
ख्रिसमसच्या निमित्ताने शिमल्यात एका दिवसात 13 हजार वाहने धावली आहेत. सुमारे 6 हजार वाहने सोलनहून शिमला, तर 7 हजार वाहने शिमल्याहून सोलनला गेली. मनालीतही परिस्थिती तशीच होती. यामुळे पेट्रोल पंपापासून टॅक्सीचालकांपर्यंत सर्वांचे उत्पन्न वाढवण्याचे काम केले आहे. हॉटेल्ससोबतच टॅक्सीचालकांचे बुकिंगही पूर्ण क्षमतेने सुरू आहे.
रेस्टॉरंट्स 24 तास सुरु
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं हिमाचल प्रदेशातील बहुतेक रेस्टॉरंट्स 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर फेडरेशन ऑफ हिमाचल हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 90 टक्के हॉटेल बुक झाली आहेत. नवीन वर्षानंतर, मनाली कार्निव्हल देखील 1 ते 6 जानेवारी दरम्यान होत आहे. त्यामुळं हॉटेल्सची कमाई भविष्यात देखील सुरु राहण्याची शक्यता आहे. शिमल्यात देखील अशीच परिस्थिती आहे. तिथेही बहुतेक हॉटेल्स बुक झाली आहेत.
बर्फवृष्टीमुळं पर्यटकांची संख्या वाढणार
यंदा हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागात 30 आणि 31 डिसेंबर रोजी बर्फवृष्टी अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यटकांची ये-जा वाढणार आहे. यामुळं स्थानिक लोकांच्या उत्पन्नही वाढ होणार आहे. मात्र, मोठ्या संख्येने लोक शिमला-मनालीकडे जात असल्यानं रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.