शिक्रापूर : छुप्या पद्धतीने टेम्पोतून चंदन वाहतूक करणारा जेरबंद

25 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

शिक्रापूर(प्रतिनिधी) :- पुणे-नगर महामार्गावरून टेम्पोमध्ये छुपा कप्पा बनवून चंदनाची वाहतूक करणाऱ्याला जेरबंद केले आहे. तर पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.

पोलीस पथकाने टेम्पो चालक सूरज कैलास उबाळे (वय 24, रा. चांदा ता. नेवासा जि. अहमदनगर) याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून चंदन व टेम्पो असा 25 लाख 82 हजार 880 रुपयांचा ऐवज जप्त करत त्याच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चंदन तस्करी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

शिक्रापूर येथून एका टेम्पोमधून छुप्या पद्धतीने चंदनाची तस्करी करून वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यांनतर त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस नाईक मंगेश थिगळे, पोलीस शिपाई अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे यांनी शिक्रापूर चाकण चौकात सापळा रचून पुणे बाजूने (एमएच 17 बी.डी 2698) हा टेम्पो नगरच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले.

त्यावेळी पथकाने टेम्पो चालकास थांबण्याचा इशारा केला असता तो पुढे गेला. त्यामुळे पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने टेम्पो मोकळा असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या पथकाने टेम्पोच्या पाठीमागील भागात पाहणी केली असता टेम्पो मोकळा असून फक्‍त एक गादी त्यामध्ये असल्याचे निदर्शनास आले. मात्र, टेम्पोची कसून तपासणी केली असता टेम्पोला पाठीमागे अतिशय गुप्त पद्धतीने कोणालाही दिसून येणार नाही असा भला एक मोठा कप्पा बनविला असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी टेम्पोतील कप्पा उघडून पाहिला असता त्यामध्ये मोठ्या आकाराच्या गोण्यांमध्ये 190 किलो चंदनाची लाकडे मिळून आली. अधिक तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.