शेवगाव – रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या, वाहने व दुकानाच्या तोडफोडीच्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याच्या आग्रही मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला कडकडीत बंद अखेर अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, प्रांताधिकारी प्रसाद मते, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईनंतर काल (गुरुवार) दुपारी सुरू असलेला बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला.
येथील समस्त हिंदू समाज व व्यापारी असोसिएशनतर्फे आज तहसील कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाचे नियोजन होत असतानाच महसूल व पोलिस प्रशासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची खालची वेस परिसरातील मारुती मंदिराच्या सभागृहात भेट घेऊन आतापर्यंत झालेल्या तपास कामाची माहिती देऊन शेवगाव पोलिस स्टेशन व नगर परिषदेचे लेखी पत्र देऊन बेमुदत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. या वेळी पोनि पुजारी यांनी व नगर परिषद मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाला प्रतिसाद देत बंद स्थगित केला गेला.
या वेळी पोलीस निरीक्षक पुजारी यांनी दिलेल्या लेखी पत्रात सविस्तर माहिती देण्यात आली. त्यात शेवगाव शहरात रविवारी (दि. 14) घडलेल्या दगडफेकीच्या दुर्घटनेबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये काल अखेर 43 आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने सुरू आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता पुरेसा बंदोबस्त दिला जाईल.
शहरातील शिवाजी चौकात सतत पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल व बेकायदेशीर कृत्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तर नगरपरिषदेमार्फत जैन गल्लीमधील रिक्षा स्थानक तत्काळ बंद करण्यात येईल. त्यासाठी पर्यायी जागा शोधून रिक्षा स्टॅंडबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हातगाड्या बंद करून त्यांच्यासाठी इतरत्र पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे लेखी दिल्यानंतर येथील व्यापारी असोसिएशनने गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेले बेमुदत बंद आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले.
त्यानुसार काही तुरळक व्यापाऱ्यांनी गुरुवारी दुपारनंतर आपली दुकाने उघडली. या वेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, सुनील रासने, डॉ. नीरज लांडे पाटील, जगदीश धूत, महेश फलके, संदीप जावळे, चंद्रकात लबडे यांच्यासह व्यापारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
पोलिस महानिरीक्षकही शेवगावकडे मार्गस्थ
पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर शेवगाव स्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिकहून निघाले असून, ते रात्री उशिरा शेवगावात दाखल होतील. त्यानंतर ते घटनास्थळाची पाहणी करून कारवाईचा आढावा घेणार आहेत.