जनतेचा स्वाभिमान जपूनच निर्णय घेणार : शेखर गोरे

कार्यकर्त्यांची बैठक; 6 एप्रिलला साताऱ्यात निर्णय जाहीर करणार

गोंदवले – माण – खटाव मतदारसंघातील राष्ट्रवादीला ताकद देण्याचे काम करूनही पक्षाकडून मिळत असलेल्या सापत्नपणाच्या वागणूकी विरोधात कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत.राष्ट्रवादीला अद्दल घडवण्यासाठी दुसरा वेगळा विचार करताना माण खटावच्या सर्वसामान्य जनतेला न विचारता कोणाच्याही दावणीला बांधणाऱ्यातला मी नाही. सर्वसामान्य कार्यकर्ते, जनतेच्या हिताबरोबरच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जिहे कटापूर, उरमोड,टेंभू आदी सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी साताऱ्यात दि. 6 एप्रिल रोजी जो कोणता निर्णय घेतला जाईल तो जनतेच्या स्वाभिमानाचा निर्णय असेल असे प्रतिपादन शेखर गोरे यांनी केले आहे.

दहिवडी ता.माण येथे बालाजी मंगल कार्यालयात वाढदिवसाचे औचित्य साधत माण – खटाव तालुक्‍यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माण खटाव तालुक्‍यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत शेखरभाऊ गोरे यांनी केक कापून साधेपणाने वाढदिवस साजरा केला. टंचाईच्या काळात जनतेला वेळेवर पाणी मिळावे म्हणून पहिल्या 7 टॅंकरच्या साथीला नवीन 3 टॅंकर विकत घेतले असून शेखरभाऊंनी ते टॅंकर जनतेसाठी लेकार्पण करून टाकत जनतेलाच वाढदिवसादिवशी भेट दिली आहे.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यावर राष्ट्रवादीकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला.कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला मदत न करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी घेतला असून शेखरभाऊ तुम्ही उद्या कोणत्याही पक्षात जावा अगदी एमआयएम पक्षात गेला तरी चालेल पण ही राष्ट्रवादी सोडा असा सूर कार्यकर्त्यांतून दिसत होता.सर्व कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना समजून घेतल्यानंतर शेखरभाऊ गोरे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भावना मी ऐकल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षासाठी मी काय केले हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे.राजकीय ताकद वाढत असताना विरोधकांबरोबरच स्वकियांकडूनही माझे पाय ओढण्याचे प्रकार झाले. मोक्‍याची कारवाईचे पाप विरोधकांनी केले मान्य आहे पण त्यांना उचलू लागण्याचे काम याच राष्ट्रवादीतील काहींनी केले आहे. प्रास्ताविक वैभव मोरे यांनी करून आभार शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू जाधव यांनी मानले.

जयकुमार गोरेच आपला कट्टर विरोधक असेल…

मतदारसंघात काहीही अफवा पसरवल्या जात आहेत. आमदार भाजपमध्ये चाललाय शेखर गोरे भाजपमध्ये चाललाय ते एकच आहेत. पण यावर कोणीही विश्‍वास ठेवू नका. आम्ही एकत्र यायचा विषयच येत नाही. हे काही बांडगुळांनी सोडलेले साप आहेत. कोणी कोठेही असो पण जयकुमार गोरे हाच आपला कट्टर विरोधक आहे.तो कोठेही जावू द्या त्याच्या विरोधातच आपली आमदारकीची लढाई असेल. अन्‌ येणाऱ्या 2019 ला कोणत्याही परिस्थितीत शेखर गोरेच आमदार असेल. तुम्ही काहीही काळजी करू नका फक्त आता पर्यंत दिली तशी साथ कायम द्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.