जनता कर्फ्यूवर पडणार ‘पिण्याचे पाणी’

निर्बंध असताना परिसरातील पालिकेच्या नळावर गर्दी

हडपसर – हडपसर परिसरात पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जीवनावश्‍यक वस्तुंची दुकानेही या कालावधीत बंद ठेवण्याच्या सूचना असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता घराबाहेर पडावे लागत आहे. हडपसर तसेच परिसरातील काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने निर्बंध असतानाही पाण्यासाठी लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. यामुळे हडपसर भागात लॉकडाऊनवर पिण्याचे पाणी पडल्याचे चित्र आहे.

हडपसरमध्ये करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून सोमवार (दि.11) पासून पाच दिवस जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. हडपसर गावठाण, सासाणेनगर, काळेबोराटेनगर, हिंगणे मळा, गाडीतळ, उन्नतीनगर, उत्कर्षनगर, सातववाडी, गोंधळेनगर या भागासह पालिकेच्या लगतच्या शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक आदी भागातही कडक निर्बंध करण्यात आले आहेत.

जीवनावश्‍यक वस्तुंसाठीची ठराविक दुकाने 7 ते 9 यावेळेतच सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत. परंतु, याच काळात पिण्याची पाणी टंचाई जाणवू लागली आहे. प्रतिबंधीत भागात पाणी पुरवठा सुरळीत असला तरी लगतच्या सय्यदनगर, हांडेवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक लगतच्या परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.

काही ठिकाणी दोन-दोन दिवसांपेक्षा अधिक दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने पिण्याचे पाणी मिळवण्याकरिता नागरिकांना हडपसर गाव परिसरात कॅन घेऊन यावे लागत आहे. पालिकेच्या नळावर मिळेल त्या ठिकाणी पाणी शोधत अनेक नागरिक दुपारपर्यंत फिरत असल्याचे चित्र येथे दिसते. तासभर पाणी येते त्यातही काहींना मिळते काहींना मिळत नाही. कमी दाबाने आणि अनियमित पाणी मिळत असल्याने आम्हाला पाण्याची वाट पाहत बसावे लागते, असे नागरिक सांगतात.

मे महिना सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला आहे. त्यातही पाच दिवस कडक निर्बंध घालून दिल्याने पाणी बॉटल घेऊन येणारे टेम्पोही या भागात येत नाहीत त्यामुळे कॅनमधून पाणी घेऊन येण्याशिवाय पर्याय नसल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे हडपसर परिसरातील पालिकेच्या नळावर पाणी भरण्यासाठी सकाळपासूनच लगतच्या परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. जनता कर्फ्यूचे नियम मोडण्याची इच्छा नसतानाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने लोकप्रतिनिधींनी पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे पुरवावे, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.