सातारा (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या मुख्य प्रतोदपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना शिवधनुष्य पेलून सातारा जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र या निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र या पराभवामुळे खचुन न जाता त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला होता.
शशिकांत शिंदे यांच्या कामाची दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिंदे यांना संधी दिली होती. शशिकांत शिंदे आमदार झाल्यानंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण होते. आता पक्षाने आ. शिंदे यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेले विधानपरिषद मुख्य प्रतोद पद देऊन त्यांचा सन्मान केला आहे. या निवडी बद्दल शशिकांत शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.