Shardul Thakur Century in Ranji Trophy 2024 : शार्दुल ठाकूर गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण देशांतर्गत सामन्यांमध्ये तो चमकदार कामगिरी करत आहे. शार्दुलने रणजी ट्रॉफी 2023-24 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावले. त्याने 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. शार्दुलच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 300 धावांचा टप्पा पार केला. चांगली फलंदाजी करण्यापूर्वी शार्दुलने गोलंदाजीतही कमाल दाखवली होती. त्याने 14 षटकात 2 बळी घेतले.
रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ अवघ्या 5 धावा करून बाद झाला. यानंतर भूपेन लालवानीही 15 धावांवर माघारी परतला. त्यानंतर एका मागोमाग फलंदाज माघारी परतत होते. मुंबईची 7 फलंदाज अवघ्या 106 धावांवर माघारी परतले होते. त्यानंतर शार्दुल 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि मुंबईचा डाव सावरला. या काळात त्याने 105 चेंडूंचा सामना करताना 109 धावा केल्या. त्याने 13 चौकार आणि 4 षटकार मारले. या शानदार खेळीनंतर शार्दुल बाद झाला. त्याला कुलदीप सेनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कर्णधार अजिंक्य रहाणेही मुंबईसाठी विशेष काही करू शकला नाही. 67 चेंडूत 19 धावा करून तो बाद झाला. रहाणेने 2 चौकार मारले. एस मुलाणी शून्यावर तर श्रेयस अय्यर अवघ्या 3 धावांवर माघारी परतला. मुशीर खानने अर्धशतक झळकावले. त्याने 131 चेंडूंचा सामना करत 55 धावा केल्या. मुशीरच्या या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेने 92 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने 3 चौकार मारले.
उल्लेखनीय म्हणजे, या सामन्यात तामिळनाडूचा संघ पहिल्या डावात 146 धावांवर गारद झाला. तामिळनाडूकडून फलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने 43 धावा केल्या. सुंदरच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. यादरम्यान शार्दुलने गोलंदाजीतही मुंबईसाठी शानदार कामगिरी केली. त्याने 14 षटकात 48 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. शार्दुलने 4 मेडन ओव्हर्स टाकल्या. तुषार देशपांडेने सर्वाधिक 3 बळी घेतले.