इस्लामाबाद – पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते शेहबाझ शरीफ ( Shehbaz Sharif) आज दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गट आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांच्या आघाडीच्या सरकारचे ते नेतृत्व करणार आहेत. आज संसदेमध्ये पंतप्रधान निवडीसाठी झालेल्या मतदानामध्ये शरीफ यांनी बहुमत सहज प्राप्त केले.
विरोधकांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजी दरम्यान हे मतदान पार पडले. पीएमएल-एन आणि पीपीपी पक्षांचे मिळून २०१ सदस्यांची मते शेहबाझ शरीफ यांना मिळाली. एकूण ३३६ सदस्यांच्या संसदेमध्ये सभागृह नेता होण्यासाठी १६९ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असताना शरीफ यांना त्यापेक्षा ३२ मते जास्त मिळाली.
शेहबाझ शरीफ यांच्या समोर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने पाठिंबा दिलेल्या ओमर आयुब खान यांचे आव्हान होते. त्यांना अवघी ९२ मते मिळाली.
संसदेचे नवनियुक्त सभापती सरदार अयाझ सादिक यांनी मतमोजणीनंतर शेहबाझ शरीफ यांना देशाचे २४ वे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे जाहीर केले. शेहबाझ शरीफ यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी सोमवारी होणार असून अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या अवान-ए-सद्र या ठिकाणी हा शपथविधी होणार आहे.
शेहबाझ शरीफ यांना पंतप्रधान म्हणून निवडण्यासाठीच्या मतदानामध्ये सर्वात पहिल्यांदा नवाझ शरीफ यांनी आपले मत नोंदवले. नवाझ शरीफ यांनी आपला पराभव स्वीकारला ही खूप मोठी गोष्ट आहे. मात्र आता शरमेने उर्वरित आयुष्य त्यांना जगावे लागणार आहे, अशी प्रतिक्रीया पीटीआयच्यावतीने देण्यात आली.
शेहबाझ शरीफ हे यापूर्वी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान पाकिस्तानमधील आघाडी सरकारचे पंतप्रधान राहिले होते. निवडणुकीच्या काही महिने आगोदर संसद विसर्जित करण्यात आली होती.
पीटीआय आणि पीएमएल-एन गटामध्ये घोषणायुद्ध…
नवीन सरकारच्या निवडीसाठी पाचारण करण्यात आलेले संसदेचे अधिवेशन पीटीआय समर्थित सदस्यांच्या घोषणाबाजीमध्येच सुरू झाले. आझादी आणि कैदी हॅशटॅग ८०४ अशा घोषणा पीटीआयचे सदस्य देत होते. तुरुंगात असलेल्या इम्रान खांन यांचा क्रमांक ८०४ असल्याच्या संदर्भाने ही घोषणा दिली जात होती. पीटीआयच्या काही सदस्यांनी इम्रान खान याची पोस्टर देखील सभागृहात आणली होती.
पीटीआय समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी पीएमएल-एन सदस्यांनी देखील लॉंग लीव्ह नवाझ अशा घोषणा दिल्या आणि सभागृहामध्ये मनगटी घड्याळे दाखवली. इम्रान खान यांच्यावर तोशखाना प्रकरणात उंची घड्याळे मिळवण्याचा आरोप असल्यामुळे त्यांनी पीटीआय सदस्यांना मनगटी घड्याळे दाखवली.
अर्धा डझन पक्षांचा पाठिंबा…
सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी २६५ जागांपैकी ७५ जागा जिंकणारा त्यांचा पक्ष संसदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शेहबाझ शरीफ यांना पीपीपी व्यतिरिक्त मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट, पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू), बलुचिस्तान आवामी पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग (झेड), इस्तकाम-ए-पाकिस्तान पार्टी आणि नॅशनल पार्टी या पक्षांचा पाठिंबा आहे.