Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. त्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघामधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवार असल्याचे मानलं जातंय. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालीय.
असे असतानाच नुकतीच बारामती तालुक्यातील जळोची येथील काळेश्वर मंदिरात खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोघींनी गळाभेट घेतली. त्यानंतर बारामती लोकसभेतील भोर विधानसभेत आयोजित ‘महासभा एकनिष्ठेची, या महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात बोलत असताना शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.
Sharad Pawar । शरद पवार म्हणाले
‘मागच्या तीन निवडणुकात मतदारांनी सुप्रिया सुळेंना निवडून दिलं. देशातील पहिल्या दोन-तीन खासदारांमध्ये बारामतीच्या खासदाराचा उल्लेख होतो. सुप्रिया सुळे यांना संसदेत ९८ टक्के उपस्थिती दाखविल्याबद्दल त्यांचे नाव घेतले जाते. सात वेळेला त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. म्हणून त्यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यांना निवडून देणं, मतदारांची जबाबदारी आहे.’
ते पुढे म्हणाले,’भोरच्या जनतेने विधानसभेसाठी संग्राम थोपटे यांना निवडून दिलं आहे. त्यामुळे या व्यासपिठावरून सांगतो संग्राम थोटपे तुम्ही या तालुक्यासाठी जे काही कराल, त्याच्या पाठी शरद पवार ठामपणे उभा आहे. राजकारणात विकासाच्या मागे शरद पवार उभे राहिले तर काय परिणाम होतो, हा दाखविल्याशिवाय मी राहणार नाही”, असे आश्वासन शरद पवार यांनी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना दिला.’
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या निवडणूक लढविणार हे स्पष्टच असले तरी आज पक्ष म्हणून त्यांची अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केली.
हेही वाचा