Sharad Pawar – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) काल अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीत साईबाबा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण केले. तसेच शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन केले.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. “शरद पवार यांनी त्यांच्या कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळातील सात वर्षांत किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपीवर साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.
आमच्या सरकारने सात वर्षांच्या कार्यकाळात साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. यावेळी राज्य सरकारने सुरु केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे कौतूक देखील मोदींनी केले’. मात्र, पंतप्रधान मोदींच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘शरद पवार यांची स्तुती करणारे मोदी खरे की कालचे मोदी खरे असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मोदी सरकारनेच शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला होता, याकडेही सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधलं’.
तर त्यांच्या प्रतिक्रियेवर काय बोलू? मी आता उद्याच त्यावर भाष्य करेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार उद्या काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काल शरद पवारांवर जेव्हा टीका करण्यात आली तेव्हा त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील व्यासपीठावर उपस्थित होते.