दौंड, (प्रतिनिधी)- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामती मतदारसंघ ते पिंजून काढत असून प्रत्येक राजकीय हालचालीवर व त्यांची बारीक नजर आहे.
याचवेळी शरद पवार हे दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या बंद दाराआड चर्चा केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. कटारीयाच्या भेटीनंतर दौंड शहरात आता नेमके काय परिवर्तन घडवतात. याची चर्चा सध्या दौंड शहरांसह तालुक्यात सुरू आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंडचे माजी नगराध्यक्ष आणि नागरिक संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली. तिघांची बंद दारावर बराच वेळ चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली, यावर शहराचे लक्ष याकडे वळले आहे.
कटारिया आणि पवार यांच्या भेटीने भाजपासह तालुक्यातील राजकारण ऐन उन्हाळ्यात आणखीनच तापलेले दौंडकरांना पाहायला मिळाले. दौंड येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीस देखील कटारिया हे गैरहजर होते. याच दरम्यान त्यांचा फोन देखील नॉटरिचेबल असल्याची चर्चा दौंड शहरात होती. मात्र, सर्व भेटीमुळे भाजपाच्या गोटात देखील खळबळ उडाली आहे.
इंदापूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण माने यांनी शरद पवार यांची साथ सोडून नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली. त्यातच त्यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हा शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. इंदापूर तालुक्यात अजित पवार गटांना शरद पवार यांना धक्का तंत्र दिला असताना आता शरद पवार यांनी दौंडमध्ये भाजपला धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी (दि.७) दौंड शहरातील आयोजित मातंग समाजाच्या संवाद मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या खंदे समर्थक दौंड शहराचे माजी नगराध्यक्ष आणि नागरिक संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची ते अध्यक्ष असलेल्या शाळेत जाऊन भेट घेतली.याप्रसंगी बंद दाराआड काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्तातच राहिले आहे.
‘वजनदार’ कटारिया
कटारिया यांच्याकडे मागील काही वर्षांपासून नगरपालिकेची सत्ता आहे. दौंड शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते ज्यांच्याकडे जातील त्यांच्या पक्षाचे पारडे जड असते त्यामुळे शरद पवारांनी कटारिया यांच्या घेतलेल्या भेटमुळे तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.