पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आंतरराष्ट्रीय योग दिवसाला ७५ दिवस बाकी असताना त्याची उलटगणना सुरू करण्याच्या सोहळ्यानिमित्त पुण्यामध्ये वाडिया महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित केलेल्या योग महोत्सवाला योगप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले होते.
०७ एप्रिल रोजी पहाटे ०६ वाजता सुरू झालेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल च्या सरावात योगप्रेमींनी सहभाग घेतला. यावेळी नाशिकच्या योगविद्या गुरूकुल चे अध्यक्ष विश्वास मंडलिक, आयुष मंत्रालयाच्या संचालक विजयालक्ष्मी भारद्वाज, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालक डॉ. सत्यलक्ष्मी आणि वैद्य डॉ. काशिनाथ समागंडी उपस्थित होते.
या योग महोत्सवाचे आयोजन पुण्यात होत आहे ही अतिशय आनंदाची आणि अभिनंदनाची बाब आहे. निरोगी आणि अधिक चांगल्या भविष्यासाठी योगसाधना ही एक जागतिक चळवळ आहे, असे आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल म्हणाले,
योगसाधना ही भारताच्या समृद्ध वारशाची एक अद्भुत देणगी आहे जिने संपूर्ण जगाला निरोगी स्थान बनवण्यासाठी अनेक लाभ दिले आहेत. मुळामध्ये योग म्हणजे एक आध्यात्मिक शिस्तबद्धता आहे जी मन आणि शरीर यामध्ये सुसंवाद निर्माण करणाऱ्या सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे, असे मंडलिक यांनी नमूद केले.