मुख्यमंत्र्यांना वाटलं, लढायला कोणी नाही

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन

बारामती – राज्यातील विधानसभा निवडणुकीचे स्वरुप मुख्यमंत्र्यांनी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. लढाईच नाही असेच तिचे स्वरुप करण्याची त्यांची धडपड होती. समोर लढायला कुणी नाही सगळं एकतर्फीच आहे. पण, लोकांनाही अस वाटलं नाही. निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाला प्रभावी भूमिका मांडता आली नाही तर लोकांना दोष देता येणार नाही, ती आमची कमतरता असेल. ही कमतरता भरुन काढण्याचे यंदा आव्हान आहे आणि त्याला आपण सामोरे गेले पाहिजे, मी तसा गेलो आणि राज्यातील तरुणाईने मला प्रचंड प्रतिसाद दिला, याचा आनंद आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी पवार पत्रकारांशी बोलत होते. सत्तेत सहभागी होणार का? या प्रश्‍नावर शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्‍न गंभीर आहेत. उद्योग-व्यावसाय बंद पडत आहेत. हजारो लोकांच्या हाताचे काम गेले आहे, या सह राज्यापुढे इतरही अनेक प्रश्‍न आहेत. हे प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्यासाठी जनमत तयार करण्याच्या कामावर राष्ट्रवादी कॉंग्रेस संघटनात्मक पातळीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

विधानसभेच्या प्रचार यंत्रणेविषयी कॉंगेस मागे पडली का? याबाबत पवार म्हणाले की, राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना दोष देता येणार नाही, असे स्पष्ट करुन शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र हा माझा घरचा भाग असल्याने येथे प्रचार ही माझी जबाबदारीच होती. मी हरियाणात प्रचाराला गेलो नाही कारण, तेथे आमची स्थिती मजबूत नाही, परिस्थिती वेगळी होती. सोनियांची प्रकृती ठीक नव्हती तर राहुल गांधीनी काही सभा घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. सातारच्या निकालाबाबत बोलताना पवार म्हणाले की, सत्तेत सहभागी होण्यासाठी पक्षांतर झाले, विरोधी पक्षात राहून आपण सत्तेत सहभागी होऊ शकणार नाही हे दिसल्यानेच पक्षांतर केले गेले व लोकांना हेच पटले नाही त्यामुळे आमच्या बाजूने लोकांनी कौल दिला.

लोकसभेच्या वेळी जे चित्र दिसले होते ते वंचित बहुजन आघाडीचे चित्र यंदा दिसले नाही, त्यांचा प्रभाव हळुहळू कमी होताना दिसत आहे, असेही पवार यांनी सांगितले. राज्यातील मतदारांनी विरोधकांना सन्मानाची जागा दिली. सन्मानजन्य अशा लोकांना निवडून दिले, लोकांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्याची पूर्तता करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करु, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

रोहित पवार हे विजयानंतर राम शिंदे यांना भेटण्यासाठी गेल्याने एक नवीन चांगला पायंडा पडला, या बाबत पवार म्हणाले की, आम्ही राजकारणात नेहमीच सुसंस्कृतपणा ठेवला, सभ्यता जपली, कटुता येऊ दिली नाही, निवडणूक संपल्यावर सगळे एकच असतात. राम शिंदे यांनी सत्तेत राहून कामे केली, वडीलकीच्या नात्याने त्यांच्या सदिच्छा घेणे हे माझ्या दृष्टीने सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे पवार यांनी सांगितले.

बारामतीकरांची कायमच साथ…
बारामतीकरांनी व्यक्तिगत मी, सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार यांच्यावर जे प्रेम केले, कायम साथ देत जी प्रतिष्ठा व नावलौकीक मिळवून दिली, यानुसार या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मते अजित पवार यांना दिली. यामुळे आमच्या डोक्‍यावरील जबाबदारीचे ओझे वाढले असून भविष्यात या जबाबदारीची पूर्तता करणे हे आमचे काम आहे. आम्ही ते अखंडपणाने करीत राहू, अशी ग्वाही शरद पवार यांनी बारामतीकरांना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.