रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे
तसेच अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई
रस्त्यावरील कारवाईची वर्षपूर्ती
पुणे – शहरात रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे तसेच अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिकेकडून मागील वर्षी दिवाळीपासून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या वर्षभरात तब्बल 41 हजार 537 नागरिकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 94 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नागरिकांबरोबरच महापालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्प करणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 152 सोसायट्यांवरही कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याकडूनही 26 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिकेकडून मागील वर्षी दिवाळीपासून सुरू केलेल्या कारवाईला 11 नोव्हेंबर 2019 ला एक वर्ष होत आहे. पालिकेने मागील वर्षी दिवाळीच्या पहिल्याच दिवसापासून शहरातील प्रत्येक चौकात पालिकेचे कर्मचारी उभे करत रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांपासून सुरुवात केली होती. यावेळी नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली म्हणून दंड वसूल करण्यासह त्यांच्याकडून रस्त्याची सफाई करून घेण्यात येत होती. त्यामुळे पालिकेची ही कारवाई शहरात चर्चेचा विषय बनली होती. तसेच, नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत केले. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून पालिकेकडून सातत्याने ही कारवाई सुरू आहे.
41 हजार बेशिस्तांवर कारवाई
गेल्या वर्षभरात पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत रस्त्यावर थुंकणाऱ्या 2,797 जणांकडून 3 लाख 81 हजार 969 रुपयांचा दंड वसूल केला असून 38,308 पुणेकरांवर रस्त्यावर कचरा टाकणे तसेच अस्वच्छता केल्याप्रकरणी कारवाई केली. या नागरिकांकडून सर्वाधिक 83 लाख 4 हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय, उघड्यावर लघुशंका करणाऱ्या 155 जणांकडून 27 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून रस्त्यावर उघड्यावर प्रात:विधी करणाऱ्यांकडून सुमारे साडेसात लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर पानटपरीच्या परिसरात अस्वच्छते प्रकरणी 98 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.