– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नव्या नेतृत्वाला संधी देण्याची घोषणा शरद पवार यांनी केली होती. त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी याला तीव्र विरोध केला. पवार यांच्या निर्णयावर एका पक्षांतर्गत समितीमार्फत विचार करण्यात आला व हा निर्णय मागे घेण्याचे पवार यांना सुचवण्यात आले. समितीच्या निर्णयानंतर पवार यांनी पत्रकारपरिषद घेत आपण निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र या पत्रकारपरिषदेला अजित पवार उपस्थित नसल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
शरद पवारांच्या राजीनाम्याचा एकट्या अजित पवारांचा पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांच्या या निर्णयाला पक्षातील सर्वच नेत्यांनी कडाडून विरोध केला. काही नेत्यांनी भावनिक भाषणं केली तर काहींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मात्र या सर्वांमध्ये शरद पवार यांचे पुतणे व विद्यमान विरोधीपक्ष नेते अजित पवार हे एकटेच शरद पवार यांच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ उभे होते. पवार साहेबांच्या हयातीत नवा अध्यक्ष घडत असेल तर त्यात वावगं काय? असा परखड सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलेला.
अजित पवारांची दादागिरी
शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षातील नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या अशी गळ घालत होते. मात्र अजित पवार यांनी या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले होते. अजित पवार यांची दादागिरी या निमित्ताने सर्वानी ऑन कॅमेरा पाहिली.
राजीनामा मागे, अजित पवार कुठे?
दरम्यान, पक्षांतर्गत समितीने शरद पवार यांचा राजीनामा नाकारत त्यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावे असे सुचवल्यानंतर शरद पवार यांनी एक पत्रकारिपरिषद घेतली. येथे त्यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे सांगितले मात्र या पत्रकारपरिषदेला अजित पवार यांची अनुपस्थितीत सर्वांच्याच डोळ्याला खटकली.
याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता, सर्वच नेते पत्रकारपरिषदेला येत नसतात. सकाळीच झालेल्या बैठकीला अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित करणे अपेक्षित नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यावर एका पत्रकाराने अजित पवार दिल्लीला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे असं सांगितलं. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी, स्मितहास्य करत ते आताच आम्हा सर्वांसोबत होते, असे सांगून चर्चांना पूर्णविराम दिला.