हवेलीतील चार गावांतून पुणे-पिंपरीत ये-जा करण्यास घातला होता मज्जाव
लोणी काळभोर- कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुकसह नऱ्हे या चार गावांत शनिवारी (दि. 6) पहाटेपासून ये-जा करण्यास घालण्यात आलेली बंदी आठ तासांच्या आत उठवावी लागली आहे. वाघोली व मांजरी बुद्रुक हद्दीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने ही बंदी उठवण्यात येत असल्याची घोषणा हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी केली आहे.
पुणे व पिंपरी चिचवड शहरातून वरील चार गावांत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी, आज (शनिवार) पहाटे पाच वाजलेपासून शुक्रवार (दि. 12) रात्री 12 वाजेपर्यंत, अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांना पुणे व पिंपरी-चिचवड शहरातून ये-जा करण्यास बंदी घातली होती. या आदेशाची अंमलबंजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व पोलिसांनी शनिवारी सकाळपासून मांजरी बुद्रुक व वाघोली हद्दीत येणारे रस्ते बॅरिकेडस् लाऊन बंद करण्यास सुरुवात केली होती.
मांजरी बुद्रुक व वाघोली गाव वगळता आसपासच्या सर्व गावांत ये-जा करण्यास बंधन नसताना, केवळ याच दोन गावांत मनाई सुरू केल्यास स्थानिक नागरिक व पोलीस यांच्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मांजरी बुद्रुक हद्दीत सकाळी दहा वाजल्यापासून अनेक नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. याच प्रार्श्वभूमीवर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने ही बंदी उठविण्याची मागणी केली होती, त्यानुसार ही बंदी उठवली असल्याचे बारवकर यांनी स्पष्ट केले.