नारोडीतील ज्येष्ठाचा मृत्यू : गिरवलीत आणखी तीन बाधित
मंचर- नारोडी येथील 64 वर्षीय करोना बाधित व्यक्तीचा शनिवारी (दि. 6) उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील करोनाचा हा पहिला बळी ठरला आहे, तर गिरवली येथील तीन व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने तालुक्यात बाधितांची संख्या 42वर पोहोचली आहे. यातील 10 जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर एकाचा मृत्यू झाल्याने आता 31 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
ग्रामीण भागात करोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्यावर मंचर व पुणे येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. गिरवली येथील तीन व्यक्ती 20 ते 50 वयोगटातील असून यामध्ये एक पुरुष व दोन महिला आहेत.
या व्यक्ती मुंबईहून आलेल्या आहे. त्यामुळे गिरवली गावातील सहा करोनाबाधित व्यक्ती आहेत. दरम्यान, वळती, जवळे, साकोरे, घोडेगाव, पिंगळवाडी (लांडेवाडी) व गिरवली प्रत्येकी एक व शिनोलीतील चार असे एकूण 10 व्यक्तींनी करोनावर मात केली आहे. तालुक्यातील 16 गावे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. मुंबई, पुणे व इतर शहरांमधून आलेल्या व येणाऱ्या नागरिकांनी काळजी घेत स्वतः क्वारंटाइन व्हावे, प्रशासनाला माहिती द्यावी. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे. लक्षणे दिसल्यास तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी जावे, असे आवाहन पठारे व डॉ. ढेकळे यांनी केले आहे.