Shambhuraj Desai: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असणाऱ्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. ठिकठिकणी तोडफोड करत जाळपोळीच्या घटना घडल्या. तर मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आणि हिंसाचार करू नये, असे आवाहन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आंदोलनाला गालबोट लागेल असे वर्तन करू नये, असे आवाहन केले होते. दरम्यान, मराठवाड्यातील आमदारांच्या घरांत जाळपोळीच्या घटना घडली त्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभुराज देसाई यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील जाळपोळीच्या घटनांविषयी बोलताना शंभुराज देसाई यांनी, “सर्वोच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती उठवणं हा एकमेव पर्याय दिसतो आहे. या सर्व गोष्टींवर महाराष्ट्रातील सकल मराठा बांधव व भगिनींनी थोडंसं गांभीर्यपूर्वक बघितलं पाहिजे. काही ठिकाणी आमदारांची घरं जाळली. आमचे विधीमंडळातील एक सहकारी आमदार त्यांच्या पत्नी माध्यमांसमोर सांगत होत्या की, त्यांची मुलं भेदरलेल्या अवस्थेत कशी घरात बसली होती.”असे म्हटले.
त्यासोबतच त्यांनी “आम्ही आमदारही जनतेचेच प्रतिनिधी आहोत. आम्ही सर्वधर्मीय, सर्वजातीय ३-४ लाख लोकांचे प्रतिनिधी आहोत. आरक्षण द्यायचं नाही असं आमच्यापैकी एकही आमदार कधी म्हटला आहे का? सर्व आमदारांचं म्हणणं आहे की, कायद्याच्या चौकटीत बसणारं, नियमात टिकणारं आणि तहहयात शिक्कामोर्तब होईल असं आरक्षण द्यायचं आहे. त्याच मताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत,” असे मत व्यक्त केले.
शंभुराज देसाई यांनी आंदोलनाविषयी बोलताना पुढे म्हटले कि , “यासाठीच एकनाथ शिंदेंनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवारांना बोलावलं आहे, उद्धव ठाकरेंना बोलावलं आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले अशा सर्व प्रमुख लोकांना बैठकीला बोलावलं आहे. आता महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र विचार विनिमय केला पाहिजे.”असे आवाहन केले आहे.
त्यासोबतच “एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी पुढाकार घेतला आहे. आज सकाळी साडेदहा वाजता ती बैठक होत आहे.त्या बैठकीत सर्वांशी चर्चा केली जाईल. सरकारची अजिबात आडमुठी भूमिका नाही. सरकार सर्वांचे विचार ऐकून घेईल. तसेच आज जे ठरले त्यासाठी सरकार सकारात्मकपणे पावलं उचलेल,” असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.