मुंबई – बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुखचा जलवा भारतासह जगभरात असल्याचे पाहयला मिळते. चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात हे आपणाला दरवर्षी त्याच्या जन्मदिनी “मन्नत’ या त्याच्या निवास्थानाबाहेरही दिसते. नुकताच शाहरुखच्या पठाण या चित्रपटाने देशभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली. त्यात आता शाहरुखने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.
टाईम-100 रिडर्स 2023 पोलमध्ये शाहरुख सर्वाधिक मते मिळवून जगात या यादीतील सर्वांत प्रभावशाली व्यक्तिमत्व बनला आहे.
2023 टाईम 100 पोलसाठी एकूण 12 लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले, ज्यामध्ये शाहरुख 4 टक्के मतांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याच्याशिवाय हॉलिवूड अभिनेत्री मिशेल येओह, जगातील प्रसिद्ध टेनिसपटूंपैकी एक असणारी सेरेना विल्यम्स, मेटा (फेसबुक) सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांचा या यादीत समावेश आहे.
यंदाच्या यादीबद्दल अन्य लोकांबद्दल बोलायचे झाल्यास 22 वर्षीय महसा अमिनीला दुसरे स्थान मिळाले आहे, तर ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन यांना तिसरे आणि चौथे स्थान मिळाले. तर फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी पाचव्या स्थानावर आहे. त्याचवेळी शाहरुख खानने सर्वांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आपले नाव कोरले आहे.
कामाबद्दल बोलायचे झाल्यास शाहरुख पठाणनंतर त्याच्या आगामी “जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नयनतारा दिसणार आहे, तर दीपिका पदुकोनही कॅमिओ करताना दिसणार आहे. पठाण सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते. तत्पूर्वी 2019 मध्ये आलेल्या त्याच्या “झिरो’ या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती.
कोलकाताच्या विजयाने खूष
शाहरुख हा भारतातील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आणि आंतरराष्ट्रीय आयकॉन आहे. तो आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक आहे. गुरूवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला जात होता, ज्यामध्ये शाहरुख केकेआरच्या विजयावर खूप आनंदी असल्याचेही दिसला. सामन्यानंतर त्याने विराट कोहलीला “झूमे जो पठाण’ गाण्याची हुक स्टेपही शिकवली.