नाशिक – नाशिकमधील देवळा-मनमाड मार्गावर एसटीला झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिला वाहकाचा जागीच तर एका प्रवाशी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात काही महिन्यांत एसटी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच मनमाड आगाराच्या बसला भीषण अपघात झाला आहे. चांदवड शहराजवळील मतेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला असून बसमधील 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस मनमाड आगारातून सुटून नांदुरीकडे गेली होती.
तिकडून परतत असताना चांदवड शिवारातील मतेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला. समोरुन येणाऱ्या वाहनाने कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी थेट समोरील झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात सारिका लहिरे या महिला कंडक्टरचा जागीच, तर एका महिला प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.