मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीचा ‘बादशाह’ शाहरुख खान त्याच्या प्रत्येक स्टाइलमुळे चर्चेत असतो. सध्या शाहरुख खान ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे आणि याच कारण आहे शाहरुखचे फॅन्स. नुकतंच शाहरूखच्या चाहत्यांनी ट्विटरवर ‘डिनर विथ एसआरके’ ट्रेंड सुरू केला. या ट्रेंडने काही वेळातच सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे शाहरुख खानने या ट्रेंडमध्ये अक्षय कुमार आणि विराट कोहलीसारख्या बड्या सेलिब्रेटींना देखील मागे टाकले आहे.
आरवीसीजे मीडियाच्या एका पोस्टने ट्विटरवर ‘डिनर विथ एसआरके’ ट्रेंड सुरू केला. यासाठी त्यांनी विराट कोहली, शाहरुख खान, मेस्सी आणि अक्षय कुमार यांच्या चाहत्यांना दोन टॅग निवडायला आणि दोन टॅग काढून टाकण्यास सांगितले. या टॅग्जमध्ये विराट कोहलीसोबत बॅटिंग, मेस्सीसोबत फुटबॉल पाहणे, अक्षय कुमारसोबत सेल्फी आणि शाहरुख खानसोबत डिनर अशा गोष्टींचा समावेश होता. मग काय, चॅलेंज सुरू होताच सोशल मीडिया युजर्सनी त्यात उत्साहाने सहभागी होऊन आपल्या आवडत्या स्टारला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले.
आरव्हीसीजेच्या या चॅलेंजमध्ये चाहत्यांनी ‘डिनर विथ एसआरके’ हा पर्याय सर्वाधिक निवडला आणि हा टॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागला. हा हॅशटॅग वापरणाऱ्या ट्विट्सची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. यावेळी फॅन्सने शाहरुखवरचे आपले प्रेम ट्विट्सच्या माध्यमातून व्यक्त करत आपल्या आवडीच्या स्टारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
शाहरुख खानच्या ‘पठाण’ने जगभरात 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर आता शाहरुख त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथची हसीना नयनतारा देखील दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 2 जून रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.