मुंबई – शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आणि पठाणने जगभर धुमाकूळ घातला. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक ते दोन महिने झाले आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा पार केला असून, एक इतिहास घडवला आहे.
हा टप्पा गाठणारा तो एकमेव हिंदी चित्रपट ठरला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच आवडल्यामुळे बॉक्स ऑफिसवर पठाणचा जलवा पाहायला मिळाला आहे. पठाण चित्रपटात अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण अशी तगडी स्टारकास्ट सिनेरसिकांना पाहायला मिळाली.
दरम्यान, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक प्रेक्षक ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासून तो ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट बघत होते. आता या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे.
येत्या 22 मार्च रोजी ‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 56 दिवस झाले आहेत. आता 56 दिवसांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.