नवी दिल्ली – टाइम मासिकाने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली. भारतीय अभिनेता शाहरुख खानसोबतच चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांना स्थान देण्यात आले आहे. राजामौली हे साऊथ इंडस्ट्रीमधील मोठं नाव असून ऑस्कर पटकावल्यानंतर त्यांची जगभरातुन फॅन फॉलोविंग वाढली आहे. तसेच लेखक सलमान रश्दी आणि टीव्ही होस्ट आणि जज पद्मलक्ष्मी यांनाही यात स्थान मिळाले आहे.
यानंतर आता अनेकांनी शाहरुखसह इतरांचे याबद्दल अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोनने शाहरुखसाठी एक खास पोस्ट लिहीत त्याचे कौतुक केले आहे.दीपिका म्हणते,शाहरुखच्या व्यक्तिमत्त्वाचं केवळ 150 शब्दांत वर्णन करता येत नाही हे अनेकांना चांगलंच माहीत आहे. शाहरुख खान नेहमीच सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जाईल. दीपिका पुढे म्हणाली, ‘तथापि, अशा काही गोष्टी आहेत ज्या त्याला इतरांपासून वेगळे करतात. या गोष्टींमध्ये त्याची विचार करण्याची पद्धत, धैर्य आणि माणुसकी यांचा समावेश होतो.
शाहरुख खानने 2023 साठी टाइम 100 रीडर पोल जिंकला आहे. त्यामध्ये, वाचकांनी सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थानासाठी पात्र वाटलेल्या व्यक्तिमत्त्वांना मतदान केले. 1.2 दशलक्ष लोकांनी या मतदानासाठी मतदान केले, ज्यामध्ये शाहरुखने सुमारे चार टक्के मते मिळवून पहिला क्रमांक पटकावला.
अभिनेत्री आलीया भट्टने राजामौली यांचे कौतुक केले आहे. ती म्हणते, ‘लोकांना माहित आहे की राजामौली यांनी नेमकं काय दिले आहे. मी त्यांना मास्टर कथाकार म्हणते कारण त्यांना स्टोरीला योग्य दिशा कशी द्यायची हे माहित आहे.
या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, किंग चार्ल्स, सीरियात जन्मलेल्या ऍक्टिव्हिस्ट सारा मार्डिनी आणि युसरा मार्डिनी, स्टार आयकॉन बेला हदीद, अब्जाधीश एलोन मस्क, प्रतिष्ठित गायक आणि कलाकार बेयॉन्से यांचा देखील समावेश आहे.