पुण्यातही पारा 8 अंशांपर्यंत घसरला
पुणे – उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि कोरडे हवामान यामुळे राज्यातील किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होऊन बोचऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे.राज्यात आज सर्वात कमी तापमान हे नाशिक येथे 6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यात ही यंदाच्या मोसमातील सर्वात कमी म्हणजे 8.2 अंश सेल्सिअस तापमान होते.
मध्य प्रदेशातील चक्राकार स्थितीमुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार दिसून येत होता. आता ही चक्राकार स्थिती विरली असल्याने उत्तरेकडील शीत लहरी थेट राज्यात येत आहे. सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गोठवणारी थंडी आहे.काही भागात तर बर्फवृष्टी होत आहे. यामुळे राज्यात सुद्धा थंडीची लाट आली आहे. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.या परिसरातील अनेक मोठ्या शहरांमधील तापमान हे पंधरा अंशा पेक्षा कमी नोंदविले गेले आहे. विदर्भात ही किमान तापमान घसरलेले आहे. कोकण आणि गोव्यात सुद्धा सरासरीपेक्षा किमान तापमानात घट झाली आहे.
राज्यात आज सर्वात कमी तापमान हे नाशिक येथे 6 अंश सेल्सिअस होते. पुण्यातील तापमान हे सरासरीपेक्षा हे तापमान दोन अंशाने कमी आहे. त्यामुळे शहरात सुद्धा चांगलीच थंडी जाणवत आहे. दिवसासुद्धा नागरिक स्वेटर जाकीट परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस शहरातील किमान तापमानात घट होणार आहे.