नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिक त्रस्त वाहतूक कोंडीत भर
दौंड – दौंड शहरात मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून, या बाबीकडे नगरपालिका प्रशासनाचे संपूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे छोटे-मोठे अपघात होऊन नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या दौंड शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे फिरताना दिसत आहेत. ही जनावरे रस्त्यावरच थवे करून उभी राहत असल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे अनेक वेळा पाहायला मिळत आहे. शहरातील रस्ते अरुंद असून, रस्त्यावरच लावलेले हातगाडी, रिक्षा आणि मध्येच उभी राहिलेली मोकाट जनावरे, यामुळे दौंड शहरात रस्ता आहे की नाही, अशीच स्थिती आहे.
शहरात नगरपालिका प्रशासनातर्फे पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आलेली नाही, तसेच रस्त्यावर देखील पार्किंगची जागा निश्चित केली नाही, त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी गाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी जर सोडवायची असेल तर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तरीत्या पार्किंगची ठिकाणे निश्चित करणे गरजेचे आहे.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मोठा
शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्री फिरत आहेत. चारचाकीसह दुचाकींच्या मागे ही कुत्री धावत जातात, त्यामुळे दुचाकी चालकानसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासदायक ठरत आहेत. दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करून त्यांना चावा घेण्याचा प्रयत्न ही कुत्री करतात. मागील काही दिवसांपूर्वी या मोकाट कुत्र्यांनी एकाचा चावा घेऊन त्यास जखमी केल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. नगरपालिका आता काय उपाययोजना करणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
कोंडवाडा आहे; पण कुठे?
शहरातील मोकाट जनावरांसाठी नगरपालिका हद्दीत कोंडवाड्याची सोय असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. मात्र सध्या हा कोंडवाडा गेला कुणीकडे, असाच प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. या मोकाट जनावरांनी ठोस मारल्याने छोटे-मोठे अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यावर नगरपालिका प्रशासनाकडून उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्री यांबाबत आपण काय उपाययोजना करणार आहेत हे विचारण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला असता मात्र ते अशा विषयांसाठी उपलब्ध झाले नाहीत. याचा अर्थ त्यांना शहराच्या विकासात रस नाही की काय, असा निर्माण होतो.
दौंड शहरातील मोकाट कुत्री पकडण्याचे टेंडर देण्यात आले आहे. मार्च 2019 ला हे टेंडर देण्यात आले. आत्तापर्यंत सुमारेआठशे कुत्री पकडून सोडण्यात आलेली आहेत. सध्या मोकाट कुत्रे पकडण्याचे काम बंद आहे, त्यासाठी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढली असून पुढील आठवड्यात मोकाट कुत्री पकडून त्यांना सोडण्याचे काम करण्यात येणार आहे.
याबरोबरच दौंड शहरातील मोकाट जनावरे मोकाट नसून त्यातील बहुतांश जनावरांना खासगी मालकांच्या ताब्यातील आहेत. पुढील आठवड्यात याबाबत शहरात रिक्षा फिरवून ही जनावरे ज्या मालकांची असतील त्यांनी घेऊन जाण्याबाबत आव्हान करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित जनावरे कोंडवाड्यात नेणार आहे.