पुणे – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी रॉड डोक्यात मारून मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि बारा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
शंकर दत्तात्रय शिर्के (रा. कार्ला, ता. मावळ) आणि विशाल किसन चव्हाण (इंदोरी, ता. मावळ) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत संजय धोंडीबा जाधव (वय 46, रा. कार्ला, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे भाऊ सुरेश हे घटनेत जखमी झाले होते.
ही घटना 1 सप्टेंबर 2013 रोजी कार्ला गावच्या हद्दीत रात्री 11 च्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षीदार तपासले. सुरेश हे रात्री जेवन केल्यानंतर गावात फिरत होते. दीड वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी रॉड डॉक्यात, हात-पायावर मारून त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लोणावळा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. जावेद खान यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना शिक्षा सुनावली.