सातारा -जिल्ह्यात आणखी दहा जणांचे करोना रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आले. विविध करोना केअर सेंटर व रुग्णालयांतील 25 जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 745 वर पोहचली आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या मुंबईहून प्रवास करुन आलेल्या 4 व बाधित रुग्णांचे निकटसहवासातील 3 अशा एकूण 7 जणांचे रिपोर्ट करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या सात करोनाबाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 46 वर्षीय महिला व क्षेत्रमाहुली येथील 50 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथील 65 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील झगलवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील दहिवडी येथील 60 वर्षीय पुरुष व किरकसाल येथील 49 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 745 झाली असून करोनातून 533 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये करोनावर 180 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यापूर्वी रविवारी उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 10 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यातील जावळी तालुक्यातील गांजे येथील 48 वर्षीय पुरुष व फलटणच्या रविवार पेठेतील 70 वर्षीय वृध्दा या 2 करोनाबाधितांचा घरीच मृत्यू झाला असून त्यांचा रिपोर्ट मृत्यपश्चात पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या दहा करोनाबाधित रुग्णांमध्ये साताऱ्यातील शाहूनगर येथील 52 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष व ग्रामीण रुग्णालयातील 53 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचारी, जावळी तालुक्यातील गांजे येथील घरीच मृत्यू झालेला 48 वर्षीय पुरुष, फलटण येथील मंगळवार पेठेतील 62 वर्षीय सारीचा पुरुष व रविवार पेठेतील घरीच मृत्यू झालेली 70 वर्षीय वृद्धा, खटाव तालुक्यातील वडगाव येथील 57 वर्षीय महिला व बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील 31 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
महिलेसह दोघांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात सारीचे रुग्ण म्हणून दाखल असणाऱ्या वारुंजी (ता. कराड) येथील 50 वर्षीय पुरुषाचा आणि कण्हेर (ता. सातारा) येथील 61 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून या दोघांच्या घशातील नमुने करोना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 19, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 42, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 12, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 3, कोरेगावच्या ग्रामीण रग्णालयातील 7, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 5, शिरवळ येथील 11, रायगांव येथील 2, पानमळेवाडी येथील 8, मायणी येथील 27, महाबळेश्वर येथील 12, पाटण येथील 3 व दहिवडी येथील 7 अशा एकूण 158 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने करोना तपासणीसाठी कृष्णा मेडिकल कॉलेज व पुण्याच्या एनसीसीएस यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.