गडाखांसह सात जणांवर गुन्हा दाखल 

आंदोलन प्रकरणी चार दिवसांनंतर गुन्हा दाखल; पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकणार

नेवासे – वडाळा बहिरोबा येथील आंदोलन प्रकरणीचे नाट्य ताजेच असताना सोनई-करजगावसह 18 गावांच्या पाणी योजनेवरून करण्यात आलेल्या रास्तारोको प्रकरणी तब्बल चार दिवसांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय वचपा काढण्यासाठी तसेच गडाखांची राजकीय कोंडी करून त्यांना चौकशीच्या फेऱ्यात गुंतवून ठेवण्यासाठीच आंदोलनाला चार दिवस उलटून गेल्यानंतर राजकीय दबावातून उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याची उलटसुलट चर्चा तालुक्‍यात रंगली आहे.

पाटपाण्याच्या प्रश्नावरून त्यांनी घोडेगाव, वडाळा बहिरोबा येथे केलेली आंदोलने गाजलेली आहेत. वडाळा बहिरोबा येथील आंदोलन प्रकरणी राजकीय दबावातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यासाठी वॉरंट बजावले असता, पोलीस यंत्रणेने त्यांना पकडण्यासाठी अवलंबिलेली शोध मोहीम व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानाच्या झडती प्रकरणाने जिल्हा हादरला होता.

या प्रकरणामुळे गडाखांचे राजकीय खच्चीकरण होण्याचा संबंधितांचा अंदाज असल्याचे समजते. त्यातच मागील आठवड्यात सोनई-करजगावसह 18 गावांच्या पाणी योजनेच्या प्रश्‍नावरून या सर्व गावांच्या ग्रामस्थांसह गडाख यांनी सोनईत सुमारे तीन तास रास्तारोको केले. त्यामुळेच हे आंदोलन झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर मोठी राजकीय खलबते करण्यात येऊन गडाख यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर परत गुन्हा दाखल करण्याचा दबाव पोलीस यंत्रणेवर टाकण्यात आल्याची दबक्‍या आवाजात चर्चा आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांच्यावर आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांची मोठी राजकीय कोंडी करून त्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवून ठेवण्यात संबंधितांना यश मिळणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.

या नव्याने गुन्हा दाखल झाल्याने गडाख बॅकफूटवर जाऊन बऱ्याच प्रमाणात शांत होतील अशी अटकळ बांधून त्यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्याची खबरदारी घेण्यात आल्याची चर्चा आहे. सोनई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल काकासाहेब देविदास मोरे यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार गडाख यांच्यासह दादासाहेब शंकर वैरागर, संदीप अशोक कुसळकर, खलील इनामदार, किरण जाधव, गणेश तांदळे, संजय जंगले, यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)