उपोषण तिसऱ्या दिवशी घेतले मागे

जामखेड – लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष पोपटराव फुले यांच्या नेतृत्वाखाली महिलासह समाजातील मागासवर्गीय दलित आदिवासी भटक्‍या समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सुरू करण्यात आलेले उपोषण अखेर रात्री तहसीलदारांच्या लेखी आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले. जामखेड तहसील कार्यालयासमोर लहुजी शक्ती सेनेच्यावतीने मागासवर्गीय दलित आदिवासी भटक्‍या समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी 16 जुलै रोजी उपोषण सुरू केले होते.

मागासवर्गीय दलित आदिवासी भटके विमुक्त नागरिकांनी शासनाच्या जागेत राहण्यासाठी केलेले अतिक्रमण नियमित करून देण्यात यावे, शिक्षणासाठी तसेच शासनाच्या विविध योजनेसाठी जातीचे दाखले तत्काळ मिळावे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ तत्काळ मंजूर करून देण्यात यावा, घरकुलासाठी विभक्त रेशनकार्ड तत्काळ देण्यात यावे तसेच वयोवृद्ध, परित्यक्ता, विधवा यांना संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्रा पोपटराव फुले यांनी घेतला होता. मात्र आपल्या मागण्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे लेखी आश्‍वासन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडून मिळाल्यानंतर अखेर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.

या उपोषणात शामराव पोडमल, नितीन मोरे, लखन क्षीरसागर, संजय गायकवाड, नामदेव साठे, लक्ष्मण क्षीरसागर, विशाल तुपे, पिनू खवळे यांच्यासह महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. उपोषणास माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर आबा राळेभात, लोकधीकार आंदोलनाचे अरुण जाधव, बापुसाहेब ओहोळ, बापुसाहेब गायकवाड, परवेज सय्यद, नय्युम शेख यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)