पिंपरी – मकरसंक्रांतीसाठी लागणाऱ्या विविध आवश्यक साहित्यांनी बाजारपेठा सजल्या असून तिळाचे दर घटल्याने तिळगुळाचा गोडवा आणखी वाढणार आहे. सणाचा गोडवा वृद्धिंगत करण्यासाठी तिळाचे लाडू तसेच चिक्की, तिळाच्या वड्या, रेवड्या, साखरेचा हलवा असे तिळगुळातील पदार्थांच्या राशी बाजारात पाहायला मिळत आहेत.
यंदा करोनाचा परिणाम सर्वच सणा-वारांवर दिसून आला. परंतु सध्या शहरातील बहुतांशी सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा मकरसंक्रांतीच्या स्वागतासाठी सजल्या आहेत.
मागील वर्षांच्या तुलनेत पांढरे तीळ स्वस्त झाले आहेत. तर तिळाच्या वड्या तयार करण्यासाठी लागणारे शेंगदाणे, गुळाची आवक वाढली आहे. तर मॉल, स्वीट मार्ट, किराणा दुकानांत तिळगुळाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. या सर्व पदार्थांना मागणी वाढली असल्याचे चित्र आहे.
हलव्याचे दागिने
मकर संक्रांतीसाठी नववधू आणि बालकांसाठी हलव्याच्या दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार यंदा पाहायला मिळत आहेत. यंदा स्त्रियांप्रमाणे पुरुषांच्याही दागिन्यांमध्ये वैविध्य आहे. पारंपारिक हार, कानातले, बाजूबंद, गळ्यातल्यासोबत बांगड्या, पाटल्या, तोडे यामध्ये वेगळेपण दिसून येते. लहान मुलांच्या दागिन्यामध्ये बासरी, मुकुट यासह हातातली वाळी, कडे, गळ्यातले हारही उपलब्ध आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत विविधरंगी आणि विविध डिझाईनमधील आकर्षक पतंग बाजारपेठेत विक्रीसाठी आलेले आहेत. बालगोपाळांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कार्टूनमधील पतंगांना विशेष मागणी आहे. संक्रांतीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने या पतंगांची खरेदी केली जात आहे.
मकर संक्रांत या सणाला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. या सणाला पतंग उडवण्याची देखील परंपरा आहे. मोकळ्या मैदानात, घराच्या गच्चीवर जाऊन बालगोपाळ पतंग उडवण्याचा आनंद घेतात. त्याशिवाय, सणानिमित्त सजावटीसाठी देखील छोट्या आकारातील पतंग वापरले जातात.
साध्या कागदातील तसेच विविध कार्टून काढलेले पतंग सध्या बाजारपेठेत पाहण्यास मिळत आहेत. मोटू पतलू, लिटिल सिंगम, कृष्णा या मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या कार्टून्समधील पतंगांना विशेष मागणी आहे. त्याशिवाय, छोट्या आकारातील पतंग चिमुकल्यांसाठी घेतले जात आहेत. 5 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत विविधरंगी आणि विविध डिझाईनमधील पतंग उपलब्ध आहेत.
करोनाबाबत जागरूकतेचा संदेश देणारे देखील पतंग यंदा विक्रीसाठी आले आहेत. घरामध्ये सजावटीसाठी वापरण्यात येणारे छोटे 20 पतंग 80 रुपयापर्यंत मिळतात. साध्या दोऱ्याचे रीळ 10 ते 20 रुपयांपर्यंत मिळत आहेत.