पुणे -सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या मेंदूज्वर (मेनिंजायटीस) नियंत्रित करणाऱ्या लसीला “जागतिक आरोग्य संघटने’ने प्राथमिक परवानगी दिली आहे. तब्बल 26 देशांमध्ये या लसींची गरज असून अगदी गॅम्बियापासून ते इथिओपियापर्यंतच्या सगळ्या देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या या रोगावर ती गुणकारी ठरणार आहे.
शहरातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 13 वर्षांच्या सहकार्यातून ही लस विकसित करण्यात आली आहे. सिरम आणि “पाथ’ (पीएटीएच) यांनी ती एकत्रित विकसित केली आहे. या प्राणघातक रोगाच्या पाच प्रमुख कारणांपासून संरक्षण करणारी पहिली लस असणार आहे. आफ्रिका आणि त्या पट्ट्यातील देशांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमणात असलेल्या विविध ज्वरांवर ही गुणकारी ठरणार आहे, अशी माहिती सिरमचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली.
तसेच ही लस परवडणारी असल्याने आणि मेंदूज्वरासारखे विकार नियंत्रित करणारी ठरेल. तसेच 2030 पर्यंत हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणणारी ठरेल अशी प्रतिक्रिया युनायटेड किंगडमचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्री अँड्य्रू मिशेल यांनी दिली आहे. सध्या आफ्रिकन मेनिंजायटीस साथीच्या प्रतिक्रियेसाठी “पॉलिसेकेराइड लसीं’चा वापर केला जातो, परंतु त्यांना मर्यादा आहेत तसेच त्यामुळे दीर्घकाळ संरक्षण होत नाही. तसेच दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ते प्रभावी नाही. मात्र, ही नवी लस या सगळ्या कसोट्यांवर उतरली आहे, असा दावाही करण्यात आला आहे.
मेंदूज्वराचे गंभीर परिणाम थांबणार
“मेनिन्गोकोकल मेनिंजायटीस’ हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो झपाट्याने स्थिर होतो. यामुळे मेंदूचे गंभीर नुकसान होऊ शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास 50 टक्के प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरते. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो; परंतु तो लहान मुलांवर अधिक गंभीर परिणाम करतो. बऱ्याचदा जीवही गमवावा लागतो, पण या लसीमुळे त्यापासून बचाव होणार आहे.