पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून देखील उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये स्थानकांवरील उद्घोषणा, नियंत्रण कक्ष, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आदी गोष्टींचा समावेश आहे. यासह रेल्वे रुग्णालयांमध्ये करोनाच्या संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षांची व्यवस्था केल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणी प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येत आहे. रुग्णालये, विमानतळ, एसटी स्टॅन्ड या बरोबरीने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयदेखील स्थानकांवर प्रबोधन करत आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये करोनासंबंधी पोस्टर्स, पत्रके, व्हिडिओ क्लिप्सद्वारे माहिती, शिक्षण देण्यात येत आहे. स्थानकांसह ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्राम,यूट्यूब या समाजमाध्यमांतून देखील प्रबोधन करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
10 बेडचा स्वतंत्र कक्ष
मध्य रेल्वेच्या पुणे, सोलापूर, नागपूर, भायखळा, कल्याण, भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयांमध्ये करोनाच्या संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केले आहे. त्यापैकी पुणे येथील रेल्वे रुग्णालयामध्ये 10 बेडचा स्वतंत्र कक्ष तयार केला असून, रेल्वे रुग्णालये प्राथमिक उपचारांसाठी सज्ज आहेत. यासह रेल्वेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सूचना आणि प्रशिक्षण दिले आहे. मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून दिल्याची माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.