नवी दिल्ली- फ्रान्समध्ये गेल्या चार दिवसांपासून दंगे सुरू असून आतापर्यंत 1300 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका मुलाची गोळी घालून हत्या केल्याच्या घटनेनंतर येथे हिंसाचार सुरू झाला आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तेथे पाठवले जावे अशी मागणी आता करण्यात आली आहे.
युरोपमधील एक प्रथितयश डॉक्टर प्रा. एन. जॉन कॅम यांनी ही मागणी केली असून त्याबद्दलचे ट्वीटही केले आहे. फ्रान्समधील दंगे रोखण्यासाठी भारतातील उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना तेथे पाठवा. ते 24 तासांत तेथील दंगली आटोक्यात आणतील असा दावा कॅम यांनी केला आहे.
एवढेच नाही तर योगी आदित्यनाथ यांच्याकडून उत्तर प्रदेशात केल्या जाणाऱ्या बुलडोझर कारवाईचीही त्यांनी प्रशंसा केली आहे. तसेच दंगेखोरांना धडा शिकवण्यासाठी यापेक्षा चांगली कोणती कारवाई असूच शकत नाही असे त्यांनी नमूद केले आहे.
प्रोफेसर जॉन हे लंडन युनिव्हर्सिटीशी निगडीत असून कार्डीयोलॉजीच्या क्षेत्रातील जगभरातील एक प्रसिद्ध नाव आहे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डीओलॉजीचे ते एक महत्वाचे घटकही आहेत. त्यांनी केलेली ही मागणी अजिब असली तरी सध्या या मागणीची जोरदार चर्चा आहे.